भाषण करावे ते राज ठाकरे यांनीच, असे आज महाराष्ट्रच नाही तर देशातील अनेकांना
वाटते. उत्कृष्ट वक्ते असलेले राज ठाकरे यांनी शाळेत कधीही वकृत्व स्पर्धेत भाग
घेतला नव्हता. हे स्वतः राज ठाकरे यांनी सांगितले आहे. एबीपी माझाच्या ऐसपैस
गप्पामध्ये राज ठाकरे बालदिनानिमित्त लहान मुलांसोबत संवाद साधत आहेत. बाळासाहेब ठाकरे आणि गाणसम्राज्ञी लता मंगेशकर यांची मुलाखत घेण्याची लहानपणापासून इच्छा होती, असेही राज यांनी सांगितले.
राज ठाकरे म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांनी मला सर्वप्रथम भाषण करण्यास उभे
केले. त्याआधी शाळेत मी कधीही भाषण केले नव्हते किंवा वकृत्व स्पर्धेतही सहभागी
झालो नव्हतो.
बाळासाहेब ठाकरेंनी कधी असं उभं राहून भाषणाची प्रॅक्टिस करुन घेतली नसल्याचे
राज यांनी यावेळी बालगोपाळांना सांगितले. ते म्हणाले, काही निवडक वेळाच त्यांनी
भाषण कसे करायचे याबद्दल सांगितले होते. ते म्हणाले होते, जे माझ्या बापाने मला
सांगितले तेच मी तुला सांगतो. भाषण करताना आपण ज्या मैदानावर उभे आहोत त्याची भाषा
आधी समजून घेतली पाहिजे. आपण किती ज्ञानी आहोत. आपल्याला किती कळते हे
दाखवण्यासाठी भाषण करायचे नाही तर समोरच्यांना ज्ञानी करण्यासाठी बोलायचे असते.
आज देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरुंची जयंती आहे. देशभर हा दिवस
बालदिन म्हणून साजरा होतो. यानिमित्ताने राज ठाकरे लहान मुलांसोबत संवाद साधत आहेत.
अनेकांनी त्यांना ते व्यंगचित्रांकडे कसे वळाले. त्यांना गाण्याची आवड आहे का, असे
प्रश्न विचारले आहे. त्यावर राज म्हणाले आम्ही तानसेन नाही तर कानसेन आहोत.